गहू पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन

गव्हावरील तांबेरा हा अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे दाणे सुकतात व जिऱ्यासारखे दिसू लागतात. या महत्त्वपूर्ण रोगाचे सखोल संशोधन जगभर झाले आहे. योग्य बुरशीनाशकांचा वापर व तांबेरा प्रतिकार जातींच्या वापरामुळे या रोगाचे व्यवस्थापन करणे शक्‍य आहे.

गव्हावरील तांबेरा रोगांचे प्रकार :
गव्हावरील तांबेरा रोगाचे खालीलप्रमाणे तीन प्रमुख प्रकार पडतात.
1) खोडावरील काळा तांबेरा (पुक्‍सीनिया ग्रॅमिनीज ट्रीटिसी), 2) पानांवरील नारिंगी तांबेरा (पुक्‍सीनिया रेकोंडिटा), 3) पानांवरील रेषांचा किंवा पिवळा तांबेरा (पुक्‍सीनिया स्ट्रीफॉमिस)
हवामानातील विशेषतः तापमानाच्या अनुकूलतेनुसार वरील प्रकार विविध भागांत आढळतात. महाराष्ट्रात व दक्षिण – मध्य भारतात वरीलपैकी खोडावरील काळा तांबेरा व पानांवरील नारिंगी तांबेरा हे दोनच प्रकार आढळून येतात. तर उत्तर भारत व दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतांवरच पिवळा तांबेरा आढळतो.

खोडावरील काळा तांबेरा :
प्रादुर्भाव व लक्षणे ः हा रोग पीक ओंबीच्या अवस्थेत असताना दिसतो. गव्हाचे खोड, पानांचे देठ, पाने, ओंबी व कुसळे इत्यादी सर्वच भागांवर दिसतात. तपकिरी (तपकिरी अंधूक लाल) रंगाच्या पुळ्या उठणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. अशा प्रकारे असंख्य पुळ्या खोड व पानभर दिसतात. या पुळ्या लांबट गोल आकाराच्या असतात. जेव्हा पुळ्यांच्या संख्येत वाढ होते तेव्हा ते एकमेकांत मिसळतात. खोडाच्या व पानाचा पापुद्रा फाडून बाहेर आलेले हे फोड म्हणजेच या बुरशीचे बीजाणू. जर हाताचे बोट यावरून अलगद फिरवल्यास तपकिरी भुकटी बोटास लागते. जसजसे तापमान वाढत जाते तसतसा खोडावरील काळा तांबेरा वाढत जातो. तांबेरा वाढीसाठी योग्य तापमान 15 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस इतके आवश्‍यक असते व आर्द्रताही पुरेशी लागते. पिकांची वाढ पूर्णावस्थेकडे झुकताच व हवेतील तापमान जसे वाढत जाते तसतसे या पुळ्यांचे रूपांतर काळ्या रंगात होते. या पुळ्या प्रामुख्याने खोड्यावर आढळतात म्हणून याला खोडावरील काळा तांबेरा असे म्हणतात.

पानांवरील नारिंगी तांबेरा :
नारिंगी तांबेराचा प्रादुर्भाव व लक्षणे गव्हाची पाने व खोडावरील देठ यावर आढळतात. पानांवर तसेच देठांवर नारिंगी रंगाच्या, गोलाकार व आकाराने लहान पुळ्या दिसून येतात. या पुळ्या सुरवातीला पानाच्या वरच्या पृष्ठभागावर दिसून येतात. त्यानंतर दोन्ही भागांवर ही लक्षणे दिसतात. हा तांबेरा रोगग्रस्त पानांवरून हलकेच बोट फिरवल्यास नारिंगी रंगाची भुकटी बोटास लागते. या नारिंगी तांबेऱ्यास वाढीस लागणारे तापमान 15अंश से. ते 25 अंश से. इतके आवश्‍यक असते.

पानांवरील रेषांचा / पिवळा तांबेरा :
पिवळा तांबेरा हा महाराष्ट्रात, गुजरात, मध्य प्रदेश, तसेच कर्नाटक राज्यात आढळून येत नाही. या तांबेऱ्यास भरपूर प्रमाणात थंड हवामानाची गरज असते, म्हणून या चारही राज्यांत हवामान पोषक नसल्याने पिवळा तांबेरा आढळत नाही.

तांबेरा रोगाचा प्रसार : (काळा व नारिंगी तांबेरा)
गहू पिकावरील तांबेरा रोगाची बुरशी फक्त गव्हाच्या जिवंत पिकावरच आपले अस्तित्व टिकवू शकते. ज्या वेळेस मैदानी प्रदेशातील गव्हाची काढणी संपते त्या वेळी या बुरशीचे बीजाणू नाश पावतात. गव्हावरील तांबेऱ्याची बुरशी ही दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील निलगिरी व पलणी टेकड्यांवर वर्षभर असते. तेथील शेतकऱ्यांनी लावलेल्या उन्हाळी वा गैरहंगामी गहू पिकावर किंवा आपोआप उगवलेल्या गव्हावर ही बुरशी वर्षभर जिवंत असते. नोव्हेंबर महिन्यानंतर दक्षिण समुद्रात होणाऱ्या वादळी वाऱ्यांमार्फत या बुरशीचे जिवाणू निलगिरी व पलणी टेकड्यांवरून प्रवास करतात. वादळी पाऊस जेथे होईल त्या पावसाबरोबर हे बीजाणू हवेमार्फत 1800 कि.मी. पर्यंत वाहून नेले जातात. जर याच वेळेस मैदानी प्रदेशात गहू पिकाची लागवड असेल तर अनुकूल हवामानात गहू पिकावर रुजतात. वाऱ्यामार्फत या रोगाचा फैलाव पुन्हा निरोगी गहू पिकाचे क्षेत्राकडे होत राहतो. दक्षिण भारतात दरवर्षी गव्हावरील तांबेरा रोग येण्याचे हे एकमेव मार्ग आहे.

तांबेरा नियंत्रणासाठी उपाय :
गव्हावरील तांबेरा रोगाचे शंभर टक्के नियंत्रण करणे अवघड काम आहे. परंतु पिकास आर्थिक नुकसान पोचणार नाही एवढे रोगाचे अल्प प्रमाण रोखणे शक्‍य आहे. रोगाचे नियोजन हे एकाच उपायाने किंवा पद्धतीने न करता विविध पद्धतींचा एकत्रित वापर केल्यास रोग नियोजन हे अधिक प्रभावीपणे होते. त्यापेक्षाही रोग झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा रोग येण्यापूर्वीच विचारपूर्वक उपाययोजना केल्यास अधिक फायद्याचे ठरते. खालीलप्रमाणे उपाय योजून तांबेरा नियंत्रण करता येते.

तांबेरा रोगाचे व्यवस्थापन सध्या करावयाचे उपाय :
*     रोगाचा प्रादुर्भाव होताच प्रोपीकोनॅझोल 200 मि.लि. प्रति 200 लिटर पाणी या प्रमाणात 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
*     या बुरशीनाशकाला पर्याय म्हणून मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्‍सीक्‍लोराईड प्रत्येकी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
*     सध्या गहू पिकाची अवस्था वाढीच्या अवस्थेत असली तरी पुढील काही उपाय शेतकऱ्यांसाठी नेहमी उपयोगी राहील.
*     तांबेरा रोगास बळी न पडणाऱ्या किंवा तांबेरा प्रतिकारक्षम जातींची शिफारशीनुसार निवड करावी.
*     रासायनिक खतांची संतुलित मात्रा घ्यावी. नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्याने गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते.
*     भारी जमिनीत पिकास पाणी देताना नियोजनपूर्वक द्यावे. (पाणी जरुरीपुरते व बेताचे द्यावे.)
*     साधारणपणे 18 ते 21 दिवसांच्या अंतराने व हलक्‍या जमिनीत 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या एकूण तीन ते चार पाळ्या कराव्यात. अति पाणी दिल्याने त्या शेतातील हवामान जास्त दमट होऊन तांबेरा रोगाच्या फैलावास मदत होते.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: