खते व बियाण्यांसंदर्भात

अलीकडच्या काळात प्रथमच या वर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात मृगाचा पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी जून महिन्याची सरासरीही ओलांडली गेली आहे. बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पेरणीयोग्य असल्याने, शेतकऱ्यांची खते व बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. काही ठिकाणी पेरणी सुरू झाली असून, बऱ्याच भागात या आठवड्यात पेरणीचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी अद्याप वाफसा झालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर, खते व बियाणे विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाऊन शेतकऱ्यांची लूट चालविल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करून व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कृषी खात्याने पार पाडायला हवी.

सुमारे दीड हजार गावे व वाड्या असलेल्या नगर जिल्ह्याचा खरीप हंगाम सर्वसाधारणपणे पाच लाख हेक्‍टरचा असतो. जिल्ह्यातील सुमारे दोन हजार खते व बियाणे विक्रेत्यांकडून त्यासाठी बियाणे व खतांची विक्री केली जाते. या दुकानदारांपैकी काही जण फक्त बियाणे व कीटकनाशके विकतात. काही जण मात्र फक्त खतांची विक्री करतात. पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांची बियाणे व खतांच्या खरेदीसाठी लगबग सुरू होते. त्या वेळी सर्वच शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. अशा वेळी शेतकरी पर्वा न करता कर्ज काढून अथवा उसनवारी करून खते व बियाण्यांची खरेदी करतो. प्रत्येक खरिपाच्या हंगामाअगोदर कृषी खात्यामार्फत खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा कांगावा केला जातो. साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना “लगाम’ घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना केली जाते.

प्रत्यक्षात मात्र चांगला पाऊस झाला, की हमखास खते व बियाण्यांची टंचाई होते, हा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामुळे ही पथके नेमकी काय “कामगिरी’ करतात, हा संशोधनाचा विषय आहे. मागणी वाढली, की कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावाने विक्री करण्याच्या घटना नगर जिल्ह्याला नवीन नाहीत. मुळात हे प्रकार रोखण्याची जबाबदारी कृषी खात्याची आहे. तथापि, कृषी खात्यातील बहुतेक मंडळींनी आपापल्या नातलगांच्या नावांनी दुकाने थाटून काळाबाजार व साठेबाजीत सहभाग मिळविलेला असल्याने, याबाबत कारवाई करण्याची नैतिकता त्यांच्यात असण्याचे काहीच कारण नाही. शिवाय, एकूण विक्रेत्यांपैकी बहुतेक विक्रेते शेतीची पार्श्‍वभूमी असलेले आहेत. असे असतानाही सामान्य शेतकऱ्यांच्या लुबाडणुकीचे कोणालाच सोयरसुतक नसते. “तेरी भी चूप और मेरी भी’ या नीतीने सर्व काही आलबेल चाललेले असते. “आमचा एवढाच सीझन,’ असे वक्तव्य करीत हात साफ करून घेण्याचा सपाटा काही विक्रेते उघडपणे करतात, ही बाबही लपून राहिलेली नाही. जुजबी छापे घालून कारवाई करायची, त्याबाबात वारेमाप प्रसिद्धी मिळवायची, असा उपक्रम कृषी खात्याची मंडळी करतात. काही वेळा चांगल्या प्रतीच्या बियाण्यांच्या नावाखाली बनावट व कमी प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. पाणलोटाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर नगर जिल्ह्याचे नाव नेलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पोपट पवार याच जिल्ह्यातले. केंद्रात कृषिमंत्री असलेल्या शरद पवार यांचेही नगर जिल्ह्यावर विशेष प्रेम. गोविंदराव आदिक, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील व आता बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने सलग तीन वेळा राज्याचे कृषिमंत्रिपद नगर जिल्ह्याकडेच आहे. असे असतानाही साठेबाजी व काळ्या बाजाराबाबतची जिल्ह्यातील अवस्था “जैसे थे’ आहे, ही वस्तुस्थिती आहे. वरील तिघांपैकी  कोणताही कृषिमंत्री खते व बियाण्यांच्या साठेबाजीला सक्षमपणे आळा घालण्यात यशस्वी झालेला नाही, हेही वास्तव आहे.

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या गतिमान कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत बियाणे दिले जाते. गरजू व गरीब शेतकऱ्यांपर्यंत हे बियाणे पोचविण्याचा उद्देश त्यामागे असतो. तथापि, प्रत्यक्षात मात्र ही बियाणे किती गरजूंपर्यंत पोचली, हा संशोधनाचा विषय ठरू शकेल. गावातील व परिसरातील बड्या मंडळींना, तसेच खात्याबाबत आरडाओरडा करणाऱ्यांनाच त्याचा लाभ गरजूंपेक्षा अधिक प्रमाणात होतो, हे वास्तवही दुर्लक्षून चालणार नाही.

खतांचा कोटा आपापल्या भागात खेचून आणण्यात नगर जिल्ह्याच्या सभोवतालच्या पुणे, नाशिक, मराठवाडा व सोलापूर भागातील नेते यशस्वी होतात. अगदी शेजारच्या आष्टी तालुक्‍यातील लोकप्रतिनिधीही स्वतः रेल्वेच्या वाघिणी भरून आणण्यासाठी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासाह पुढाकार घेतात. आपल्याकडे मात्र राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेते फक्त स्वतःच्या “गडा’पुरताच विचार करतात. त्यामुळे उंचीने मोठे असलेले हे नेते कर्तृत्त्वाने मात्र खुजे का असतात, असा सवाल आता सर्वसामान्य शेतकरी विचारू लागला आहे.

सर्वच विक्रेते चोर असतात, असे वातावरण कृषी खाते प्रत्येक हंगामाच्या सुरवातीला तयार करते. प्रत्यक्षात मात्र “मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर,’ अशी कृती असते. गेल्या काही वर्षांत जून ते ऑगस्टपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्याने बियाणे कंपन्या गाफील राहिल्या असतील; परंतु निसर्गाने केलेल्या कृपेचा फायदा थेट शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यासाठी कृषी खात्याने युद्धपातळीवर बियाणेवाटपाचे नियोजन करणे गरजेचे आहे. आजही जिल्ह्यातील अनेक बियाणेविक्रेते थेट विदर्भ व मराठवाड्यातून बियाणे मागवत आहेत. सर्वच विक्रेते काळाबाजार अथवा साठेबाजी करीत नाहीत. मोजकेच विक्रेते हे कृत्य करतात. त्याचा परिणाम अखिल विक्रेते बदनाम होण्यात होतो, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. एकंदरीत, कृषी खात्याने याबाबत व्यापाऱ्यांवर “लक्ष’ ठेवून बियाणे व खतांच्या खरेदी आणि बनावटपणाबाबत प्रबोधन करणे, ही काळाची गरज आहे. त्यातूनच खात्याची प्रतिमा अधिक उजळ होऊन शेतकऱ्यांची हानी व कुचंबणा टळेल.

 

Advertisements

१ प्रतिक्रिया (+add yours?)

 1. गांडूळांच्या संवर्धनासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
  फेब्रुवारी 06, 2011 @ 03:38:32

  १. एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त २००० गांडूळे असावीत.
  २. बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रुंपासून गांडूळाचे संरक्षण करावे.
  ३. संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान २० अंश ते ३० अंश सेंटिग्रेडच्या दरम्यान ठेवावे. गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
  ४. गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा ४० ते ४५ टक्के ठेवावा.
  ५. गांडूळे हाताळतांना किंवा गांडूळ खत वेगळे करताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडूळे वेगळी करावीत, जेणेकरुन इतर गांडूळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.

  उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळण्यासाठी महत्वाच्या बाबी
  १. शेणखत, घोडयाची लीद, लेंडी खत , हरभ-याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाजीपाल्याचे अवशेष, सर्व प्रकारची हिरवी पाने व शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे गांडूळाचे महत्वाचे खाद्य होय.
  २. स्वयंपाकघरातील वाया गेलेले भाजीपाल्याचे अवशेष , वाळलेला पालपाचोळा व शेणखत समप्रमाणात मिसळले असता गांडूळाची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
  ३. हरभ-याचा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३:१० या प्रमाणात मिसळल्यास उत्तम गांडूळ खत तयार होते.
  ४. गोरगॅस स्लरी, प्रेसमड, शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.

  गांडूळ खत वापरताना घ्यावयाची काळजीः
  १. गांडूळ खताचा वापर केल्यानंतर रासायनिक खते कीट कनाशके किंवा तणनाशके जमिनीवर वापरु नयेत.
  २. गांडूळ शेतीत पिकांच्या मुळांभोवती चांगला ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच तो वर्षातून ९ महिने टिकवणे आवश्यक आहे.
  ३. गांडूळ आच्छादनरुपी सेंद्रीय पदार्थांचा वापर अन्न म्हणून करत असल्यामुळे त्या सेंद्रीय आच्छादनाचा पुरवठा वरचेवर करणे आवश्यक आहे.
  ४. योग्य प्रमाणात ओलावा आणि आच्छादनाचा पुरवठा झाला नाही तर गांडूळांच्या कार्यक्षमतेते घट येते.

  गांडूळांचा वापर करुन सेंद्रीय खत निर्मिती या तंत्रज्ञानाचा वापर करुन सन १९९३-९४ पासून कृषि विभागामार्फत तालुका बीज गुणन प्रक्षेत्रावर गांडूळ खत/ कल्चर उत्पादन कार्यक्रम कार्यान्वित केला आहे. आतापर्यंत १७९ तालुका बीज गुणन केंद्रावर हा कार्यक्रम सुरु असून तालुक्यातील शेतक-यांना लगतच्या प्रक्षेत्रावर गांडूळ खत/कल्चर उपलबध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रक्षेत्रावर उत्पादीत केलेले गांडूळ कल्चर रुपये ४००/- प्रतीहजार व गांडूळ खत रुपये २०००/- प्रती टन या दराप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. तसेच कृषि चिकित्सालयामार्फत गांडूळ खत उत्पादनाचे प्रशिक्षण / प्रात्यक्षिक शेतक-यांना देण्यात येत

  उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: