बीजप्रक्रिया, जिवाणू खंतांचे महत्त्व

कपाशी लागवडीखालील क्षेत्रात होत असलेल्या वाढीमुळे उडीद- मुगाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आहे. दैनंदिन आहाराची गरज भागविण्यासाठी परजिल्ह्यातून कडधान्य आयात करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर पुरेशा, प्रथिनयुक्त सकस आहाराची उपलब्धता वाढविण्यासाठी राज्यात कडधान्य उत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गतच जळगावसह यावल, रावेर, अमळनेर आणि धरणगाव तालुक्‍यांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. पाचही तालुक्‍यातील सुमारे 56 गावांच्या कार्यक्षेत्रातील 4,000 हेक्‍टरवर उडीद आणि मुगाची पेरणी शक्‍य झाली असून, सुमारे 4,720 शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे. उत्पादन वाढीसाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार, कडधान्याच्या संकरित व सुधारित वाणांचा वापर वाढविण्यासाठी नामांकित बियाण्यांचा पुरवठा करणे, रायझोबियम, पी.एस.बी कल्चरसारख्या जिवाणू खतांच्या बीजप्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, शिफारशीनुसार प्रतिहेक्‍टरी झाडांची संख्या वाढविणे, एकात्मिक अन्नद्रव व्यवस्थापनांतर्गत गंधक आणि सूक्ष्म मूलद्रवांच्या वापरावर भर देणे, संरक्षित पाणी देऊन उत्पादनक्षमता वाढविणे, आदी उद्देश सुरवातीपासून डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहेत. त्याप्रमाणे नियोजन करून कृषी विभागातर्फे लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रतिहेक्‍टरी 10 किलो उडीद, मूग बियाणे, 400 किलो जिप्सम, 20 किलो झिंक सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट, पाव किलो रायझोबियम कल्चर देण्यात आले आहे. आता आंतरमशागतीसाठी प्रत्येकी एक डावरे म्हणजे कोळपे आणि पीक संरक्षणासाठी सल्फरचे वाटप केले जात आहे. यानंतर पुढे पीक वाढीसाठी आवश्‍यक असलेला युरिया देखील प्रतिहेक्‍टरी 10 किलोप्रमाणे देण्यात येणार आहे. योजनेत सहभाग घेतल्यापासून टप्प्याटप्प्याने सर्वप्रकारचे उपयुक्त साहित्य मिळत असल्याचे बघून शेतकऱ्यांमध्येही सध्या चांगलाच उत्साह संचारला आहे.

‘सीओएफ’ तंत्राची कृती

‘सीओएफ’ तंत्राची कृती, त्यातील घटक, साठवणूक निरनिराळ्या पिकांसाठी खतांचे आकारमान, घटक , मशीन्स वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत व ते आकारमान का वेगळ्या स्वरूपाचे आहे, हे लगेच समजणार नाही. लघुउद्योग म्हणून गोठेवाले यांच्यासाठी सीओएफ  तंत्रअत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
रासायनिक खतास पर्याय ठरू शकणारे मोडक C.O.F. तंत्र अर्थात Modak Compact Organic Fertiliser Tech. जगात अद्याप या तंत्रावर आधारित सेंद्रिय खताचा शेतीसाठी वापर केला गेला नाही, असा दावा आहे. आज आपण रासायनिक खताचा उपयोग करून आपल्या पिकाच्या उत्पादनात वाढ केली आहे. परंतु काही कालावधीनंतर उत्पादनात घट येऊ लागली म्हणून अधिक रासायनिक खताचा वापर होऊ लागला आणि त्याचे मानवी आरोग्य व जमिनीवर दुष्परिणाम होऊ लागले. मुख्यत्वेकरून युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश खतांचा वापर मुक्त हस्ते होऊ लागला. जमिनीतील भौतिक गुणधर्म टिकून ठेवण्यास सेंद्रिय घटकांचीच आवश्यकता असते. सेंद्रिय पदार्थ जमिनीत गाडल्यानंतर प्रथम ते जिवाणूचे खाद्य म्हणून उपयोगात आणले जाते आणि हे काम सी.ओ.एफ. तंत्राने बनविलेल्या खतामुळे सहज शक्य आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
हे सेंद्रिय घटक शेतकरी जमिनीस देण्यास कमी पडत आहे. जमिनीतील सूक्ष्म जिवाणूचे वजन मातीच्या एकूण वजनाच्या ०.५ ते १.० इतके असते. परंतु जमीन सुपिकतेत त्यांचे कार्य लक्षणीय असते. सेंद्रिय घटक म्हणजे शेण, कुजलेला पालापाचोळा, शेतात पडणारे सहज उपलब्ध होणारे घटक हे आहेत. परंतु शेतकरी हे घटक योग्य प्रमाणात जमिनीस देऊ शकत नाही. सध्या या सेंद्रिय खताच्या किमतीही वाढल्या आहेत. पिकांच्या मुळाशी कमीतकमी परंतू योग्य प्रमाणात या सेंद्रिय खताचे वितरण कशाप्रकारे करता येईल ही मुख्य समस्या आहे. शेतकरी आपल्या जमिनीत ट्रॉली अथवा बैलगाडीने शेतात खत नेतात. तेथे त्याचे ढीग घातले  जातात. नंतर ते पाटीने अथवा खोऱ्याने विस्कटले जातात. या प्रकारात शेतकऱ्याच्या कामानुसार विस्कटणे क्रिया होते  कारण विस्कटल्यानंतर नांगरट इतर मेहनतीद्वारा जमिनीत ते एका विशिष्ट खोलीवर स्थिरावू  शकते. परंतु जर खत दिल्यानंतर मेहनत केली गेली नाही तर ते योग्य खोलीवर स्थिरावू शकत नाही. वारा, पाऊस या गोष्टीमुळे ते शेताच्या विशिष्ट भागात स्थिरावते किंवा उतार जास्त असल्यास शेताच्या बाहेरसुद्धा पाण्यामार्फत जाऊ शकते. कारण सेंद्रिय घटक वजनाने हलक्या स्वरूपात असतात. सर्वसाधारण मातीच्या १५ ते ३० सें.मी. थरात हे सेंद्रिय घटक असणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्याने, पुराने या थरांचे नुकसान होण्याची शक्यता असते.
एक हेक्टर क्षेत्रातील १५ सें.मी. मातीचे वजन २२४५९१३ किलो इतके असते. जर दोन ते पाच सें.मी. माती वाहून गेली, तर किती नुकसानकारक  वस्तुस्थिती आहे हे लक्षात येईल. आज रासायनिक  खताच्या किमतीही वाढत आहेत. शेतीसाठी काही मुख्यत्वे खर्चाच्या ज्या बाबी आहेत त्यात कोणतीही तडजोड करता येणे अशक्य आहे. मग कोणत्या ठिकाणी खर्चाची बचत करणे योग्य ठरणार आहे. रासायनिक खत खरेदीत आपण बचत करू शकणार आहोत. रासायनिक खतापासून जमिनीचा ऱ्हास रोखणार आहोत. परंतु रासायनिक खतसुद्धा गरजेचे आहे. कमीतकमी प्रमाणात मोडक सी.ओ.एफ. तंत्राने बनविलेल्या खताचा वापर योग्य व फायदेशीर ठरणार आहे. हे तंत्र समजण्यास शेतकऱ्यांना २-३ वर्षांचा कालावधी लागणार आहे, पण आज त्याची गरज आहे. आज आपण खत दुकानात जाऊन रासायनिक खते विकत आणतो. परंतु तीसुद्धा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होणे दुरापास्त ठरत आहे. मोडक सी.ओ.एफ. तंत्राने सदरहू खत शेतकऱ्याने आपल्या शेतात त्याच्याकडे उपलब्ध असणाऱ्या गाव खतापासून मशिनच्या साहाय्याने मोकळ्या वेळात  बनवून ठेवायचे आहे. त्यासाठी फार खर्च येणार नाही. सदरहू खत विश्वासाचे असेल कारण ते आपण स्वत बनविलेले आहे.
त्यासाठी पुढील जिवाणू खतांचा वापर केला जातो. नत्र स्थिर करणारे जिवाणू अझेटोबॅक्टर, रायझोबियम, अ‍ॅझोला, स्फूरद विरघळवणारे जिवाणू फॉस्फेट सॉलुब्लायझिंक बॅक्टेरिया  (पीएसबी), गंधक विरघळणारे जिवाणू  (एसएसबी), कुजण्याची प्रक्रिया घडविणारे जिवाणू डिकाम्पोस्टिंग कल्चर, रोग व किडीपासून पिकांचा बचाव करणारे जिवाणू ट्रायकोडर्मा व्हीरीडी जे आपणास कमी किमतीत खत दुकानात सरकारी अनुदानाने उपलब्ध होतात. या घटक वापरामुळे जमिनीस जे आवश्यक असणारे घटक आपण देऊ शकतो. मी एक शेतकरी आहे. आज मी जे मोडक सी.ओ.एफ. तंत्र विकसित करीत आहे. त्याचे मी प्रयोग केले आहेत, करत आहे. परंतु हे प्रयोग सर्वत्र होणे गरजेचे आहे. कारण जमिनीचेसुद्धा वेगवेगळे गुणधर्म असतात. माझ्यावरसुद्धा मी शेतकरी असल्याने सदर प्रयोगात काही मर्यादा पडतात. जर काही संस्था, व्यक्ती सहकार्य करू शकत असतील तर हे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत मी पोहोचवू शकेन.

भात पिकाच्या अधिक उत्पादनासाठी

पिकांना नत्र खत दिल्यामुळे उत्पादनात बरीच वाढ होते. रासायनिक नत्र खतांच्या किंमती दरवर्षी वाढतच आहेत, तसेच शेतक~यांच्या आर्थिक अडचणीमुळे अनेकदा रासायनिक व सेंद्रीय खते देणे आवाक्याबाहेरचे झाले आहे.

भात पिकास नत्र खताची अत्यंत आवश्यकता असते, परंतु भात पिकास दिलेल्या नत्राच्या मात्रेपैकी फक्त ३५ टक्के नत्रच भात पिकाला मिळते आणि उरलेला नत्र पाण्यावाटे खाली झिरपून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून किंवा हवेत उडून जातो. अशावेळी भात पिकास खत देण्याचे असे तंत्रज्ञान हवे की, ज्यामुळे जास्तीत जास्त नत्र पिकाला मिळू शकेल. हवेतील मुक्त नत्र स्थिर करणा~या निळयाहिरव्या शेवाळाच्या वापरामुळे वरील दोन्हीही उद्दिष्टये साध्य होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकेल.

या अपरिहार्य परिस्थितीवर तोडगा म्हणून गेल्या दशकात जिवाणू खतांचा वापर सुरु झाला. जिवाणू खतातील सजीव सूक्ष्म जंतू हवेतील नत्राचे पिकांना उपलब्ध होणा~या नत्राच्या स्वरुपात रुपांतर करतात. या कारणामुळे खत दुर्मीळतेच्या काळात या जिवाणू खतांचा वापर प्रचलित होऊ लागलेला आहे.

महाराष्ट्र राज्यात एकूण १.४२ दशलक्ष हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे. बहुतांश शेतकरी अल्प भूधारक असल्यामुळे त्यांना महाग रासायनिक किंवा अन्य खते वापरणे आर्थिकदृष्टया परवडत नाही.

 

निळे-हिरवे शेवाळ

फांद्याविरहित लांबच लांब तंतूमय असणारी ही एकपेशीय पाणवनस्पती आहे. त्यांच्या पेशींमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे सूर्यप्रकाशात या पेशी कर्बोदके तयार करतात व प्राणवायू पाण्यात सोडतात. या शेवाळाच्या शरीर रचनेत एक विशिष्ट कठीण व पोकळ अशी पेशी असते. त्यास हेटरोसिस्ट पेशी असे म्हणतात. या पेशीमध्ये मुक्त नत्र कार्यक्षमरित्या स्थिर केला जातो व तो नत्र नंतर भात पिकाला पुरविला जातो. त्यामुळे भात पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. नदीच्या पाण्यात किंवा साठलेल्या पाण्याच्या डबक्यात आपण अनेक प्रकारची शेवाळे वाढताना पाहतो, परंतु या सर्वच शेवाळात हेटरोसिस्ट पेशी नसतात. त्यामुळे नत्र स्थिरीकरणाचे कार्य ते शेवाळ करु शकत नाहीत. भात शेतीमध्ये ब~याच वेळा निळया-हिरव्या शेवाळांच्या जातींबरोबर इतरही काही हिरव्या शेवाळांची वाढ झालेली दिसून येते. अशा प्रकारची शेवाळे भात पिकास हानिकारक ठरतात. त्यांच्या तंतुची लांबीही खूप मोठी असते.

 

निळेहिरवे शेवाळ सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करते, तसेच हवेतील नत्र स्थिर करुन मुक्त नत्र पिकांना उपलब्क्ध करुन देऊ शकते. निळया-हिरव्या शेवाळाच्या वाढीसाठी व नत्र स्थिर करण्यासाठी योग्य परिस्थिती उपलब्ध असेल, तर सर्वसाधारणतः (निळे-हिरवे शेवाळ ) ३० किलो नत्र एका हंगामात दर हेक्टरी स्थिर करु शकते. त्याचप्रमाणे जमिनीत सेंद्रीय द्रव्यांची भर पडते व जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची धूप कमी होते, न विरघळणारा स्फुरद जास्तीत जास्त प्रमाणात विरघळविला जातो व पिकाच्या वाढीस उपयुक्त अशा वृध्दीसंप्रेरकांचा पुरवठाही केला जातो. रासायनिक, नत्र खत एकदा पिकाला वापरल्यानंतर पीक वाढीसाठी नत्राचा उपयोग करुन घेते. त्यामुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण कमी कमी होऊन नष्ट होते, परंतु निळया-हिरव्या शेवाळाच्या बाबतीत वेगळेच आहे. पीक फक्त निळया-हिरव्या शेवाळाने जमिनीत स्थिर केलेला नत्र, वृध्दीसंप्रेरके व पाण्यात सोडलेला प्राणवायू यांचाच वाढीसाठी व उत्पादनासाठी उपयोग करुन घेते. परंतु शेवाळ नष्ट किंवा कमी न होता वाढतच राहते. ज्या ठिकाणी भात हे सलग पीक घेतले जाते, त्या ठिकाणी अशा उपयुक्त शेवाळाचा सतत वापर केल्यास उपयुक्त नसणाया शेवाळांची वाढ कमी होऊन वापरलेल्या शेवाळाची वाढ भरपूर होते व नत्र स्थिरीकरणाचे कार्य कार्यक्षमरित्या होऊ शेकते.

 

निळे-हिरवे शेवाळ पिकाला अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा करते. त्याचप्रमाणे जी घटकद्रव्ये पिकांना उपलब्ध होत नाहीत, ती सुध्दा थोडया प्रमाणात उवलब्ध करुन देऊन पिकांची अन्नद्रव्यांची (मूळ व सूक्ष्म ) भूक भागविली जाते. त्यामुळे पिकांची सर्वांगीण वाढ होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते. वरील सर्व फायदे विचारात घ्ेाता, भात पिकास निळया-हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे दर हेक्टरी ३०० ते ४०० रुपयांचा निव्वळ नफा होतो.

 

विविध निळे-हिरवे शेवाळ

 

) ऍनाबिना ) ऑसिलॅटोरिया
) नोस्टॉक ) रेव्हूलारिया
) ऍलोसिरा ) वेस्टीलॉपसिस
) टॉलीपोथ्रिक्स ) सिलेंड्रोपरमम
) प्लेक्टोनिमा १०) कॅलोथ्रिक्स

निळेहिरवे शेवाळ वापरण्याची द्ध

शेताची चिखलणी करुन नत्र खताचा पहिला हप्ता देऊन झाल्यावर सदृढ व जोमदार रोपांची पुनर्लागण करावी. भाताच्या पुनर्लागणीच्यावेळी खाचरातील पाणी माती मिश्रित गढूळ झालेले असते. ते पाणी स्वच्छ झाल्यावर व मातीचे कण खाली बसल्यावर म्हणजे पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो निळे-हिरवे शेवाळ प्रती हेक्टर संपूर्ण शेतावर सारखे पडेल या पध्दतीने फोकून टाकावे. नंतर पाणी ढवळू नये. म्हणजे टाकलेल्या निळया हिरव्या शेवाळावर मातीचे कण बसणार नाहीत. शेवाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश पाण्यामधून जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत पहोचेल व शेवाळाची वाढ स्वच्छ पाण्यात सूर्यप्रकाशात भरपूर होईल. साधारणतः तीन आठवडयात शेवाळाची वाढ जमिनीच्या पृष्ठभागावर झालेली दिसेल, तसेच ही वाढ पाण्यावरसुध्दा तरंगताना दिसून येईल. अशा पध्दतीने तयार झालेले शेवाळ पेशीमध्ये स्थिर केलेला नत्र रोपाला पुरविला जातो त्यामुळे भात रोपांची वाढ जोमदार होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्याचप्रमाणे जवळ जवळ २५ टक्के नत्र खताची बचत होते.

 

निळे-हिरवे शेवाळ व नत्र खत या दोहोंच्या वापरामुळे उत्पादनात निव्वळ नत्र खतांच्या वापराने येणाया उत्पादनापेक्षा लक्षणीय वाढ होते. ही वाढ सरासरी २०० किलोपासून २५० किलोपर्यंत प्रती हेक्टर असते. निव्वळ नत्र खत वापरण्याऐवजी नत्र खत व निळे-हिरवे शेवाळ वापरणे हे उत्पादन वाढीचे दृष्टिने अत्यंत फायदेशीर ठरले आहे. भात शेतीपासून जास्तीत जास्त उत्पादन हवे असल्यास नत्र खताच्या प्रमाणित मात्रेबरोबरच २० किलो शेवाळ प्रती हेक्टर वापरणे आवश्यक आहे. २० किलो शेवाळाची किंमत फक्त ४०/- रुपये असल्याने उत्पादन खर्चातही फारशी वाढ होत नाही, परंतु भात उत्पादनात २ ते ३ क्विंटलची वाढ होते. शेवाळामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब ०.२ ते ०.३ टक्के वाढतो. तसेच एकूण नत्र ०.०१ ते ०.०२ टक्के वाढतो. त्यामुळे जमिनीचा पेात सुधारतो. त्याचा फायदा पुढील पिकाला चांगला मिळून उत्पादनात वाढ होते.

 

भाताच्या भरघोस उत्पादनासाठी नत्र खताची प्रमाणित मात्रा द्यावी. पुनर्लागण केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो शेवाळ प्रती हेक्टर फोकून द्यावे, म्हणजे हे शेवाळ पाण्यात जमिनीच्या पृष्ठभागावर सूर्यप्रकाशात चांगले वाढून कार्यक्षमपणे नत्र स्थिरीकरणाचे कार्य करेल, त्यायोगे उत्पादनात निव्वळ नत्र खतापेक्षा लक्षणीय वाढ दिसून येईल.

 

निळे हिरवे शेवाळ वाढविण्याची पध्दत

सर्वसाधाराणपणे २ x x ०.२ मी. आकाराचे वाफे तयार करुन त्यावर २०० मायक्रन जाडीचा पॉलीथिन पेपर टाकावा. पॉलिथिन पेपरवर साधारणतः ८ ते १० किलो बारीक माती पसरावी. त्यामध्ये २५ ग्रॅम कार्बोफ्युरॉन मिसळावे. तसेच ७ ते १० सें.मी. पाण्याची पातळी ठेवून त्यामध्ये २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट, २ ग्रॅम सोडियम मॉलीबडेट, ४० ग्रॅम फेरस सल्फेट, ५० ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड यांचे मिश्रण टाकून आतील माती ढवळावी. माती तळाशी बसल्यावर शांत पाण्यात निळे हिरवे शेवाळाचे परीक्षा नळीतील किंवा प्रयोगशाळा/मध्यवर्ती केंद्र यांनी पुरविलेले मूलभूत बियाणे छिडकावे. साधारणपणे ८ ते १० दिवसात शेवाळाची भरपूर वाढ होते व त्याचा पाण्यावर चांगला थर जमते. भरपूर वाढ झाल्यावर पाणी आटू द्यावे. सुकलेली माती गोळा करुन ती सावलीत वाळवावी. सुकलेली शेवाळ पापडी/शेवाळ मिश्रित माती प्लॅस्टिक पिशवी किंवा कापडी पिशव्यामंध्ये गोळा करावी. या शेवाळ पापडीचा / शेवाळ मिश्रित मातीचा पुढील पिकासाठी शेवाळाचे बियाणे म्हणून उपयोग करता येतो. हे बियाणे भात लावणीनंतर ८ ते १० दिवसांनी भात खाचरामध्ये २० किलो या प्रमाणात दर हेक्टरी वापरावे.

 

वरील पध्दती व्यतिरिक्त शेतकयांच्या सोयीनुसार पत्र्याच्या ट्रेमध्ये (चौकोनी आकाराच्या) किंवा सिमेंटच्या स्लॅबवर वरील पध्दत वापरुन शेवाळाचे बियाणे तयार करता येते. शेवाळ वाढविताना डासांचा किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बंदोबस्तासाठी कीटकनाशकांचा वापर करावा.

 

महत्वाचे

1.  निळे-हिरवे शेवाळ वापरल्याने रासायनिक खतांची उणीव संपूर्णपणे भरुन काढता येत नाही, म्हणून शेवाळ हे रासायनिक खतांना पूरक खत म्हणून वापरावे.

2.  भाताच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी रासायनिक नत्र खतांची प्रमाणित मात्रा व २० किलो शेवाळाचे बियाणे प्रती हेक्टर वापरावे.

  1. रासायनिक खते, औषधे व शेवाळ एकत्र मिसळून वापरु नये, त्यांचा स्वतंत्रपणे उपयोग करावा.

4.  रासायनिक खतांच्या संपर्कात किंवा रिकाम्या झालेल्या रासायनिक खतांच्या पिशव्यांमध्ये शेवाळाचे बियाणे साठवू नये.

5.  शेवाळाची मात्रा भाताच्या पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी पाणी स्वच्छ झाल्यानंतर शेतात फोकून/पसरवून द्यावी व त्यानंतर पाणी ढवळू नये.

  1. शेवाळाच्या वाढीसाठी भात शेतात पाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे.

7.  भात शेतात कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा तणनाशकांच्या प्रमाणित वापराचा शेवाळावर अनिष्ट परिणाम होत नाही.

 

 

 

उपलब्धता

 

निळे-हिरवे शेवाळाच्या मूलभूत बियाण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

  1. कृषि अणुजीव शास्त्रज्ञ, कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे-५
  2. विभागीय कृषि सहसंचालक (विस्तार) कोकण विभाग, ठाणे-४
  3. विभागीय कृषि सहसंचालक (विस्तार) नागपूर विभाग, नागपूर