भात

 1. भात पिकाच्या कर्जत 8 हे बियाणे 140 ते 145 दिवसांमध्ये (गरवा) तयार होते. ते आखूड व बारिक दाण्याचे पीक आहे. कडा आणि कडा करपा या रोगांना साधारण प्रतिकारक ठरणारी ही जात आहे. प्रति हेक्टरी सरासऱी पाच ते सहा टन उत्पादन या वाणातून मिळते. (को.कृ.वि.दापोली)

  भाताचा रत्नागिरी 5 हा वाण कमी कालावधीत येतो. कमी उंचीचे हळवा आखूड बारिक दाण्याचा असून करपा मानमोडी कडा करपा आणि पांढ-या पाठीचे तुडतुडे या किडींना सहन करू शकते. याची उचत्पादनक्षमता हेक्टरी 3.6 टन आहे.(को.कृ.वि.दापोली)

  सह्याद्री 5 हा भाताचा संकरित वाण पाणथळ जमीनीसाठी उपयुक्त आहे. 100 ते 150 सेमी मध्यम उंचीचे लांबट बारिक दाण्याचा हा वाण न लोळणारा व दाणे न गाळणारा आहे. हेक्टरी 6.6 टन एवढी उत्पादनक्षमता आहे. (को.कृ.वि.दापोली)

  बासमती 370 पेरभातासाठी नत्र स्फुरद आणि पालाशच्या 75.50.50 मात्रेबरोबर हेक्टरी 10 टन कंपोस्ट वापरावे आणि भात पेरणीनंतर 1 टक्के तिव्रतेच्या हिराकस ह्या द्रव्याच्या दोन फवारण्या पहिली पेरणीनंतर 1 महिन्याने व दुसरी पेरणीनंतर 1.5 टक्के महिन्याने करण्याची शिफारस केली आहे.

 2. पश्चीम घाट विभागातील जस्ताची कमतरता (0.5 मी.ग्रॅ। कि. पेक्षा कमी ) असलेल्या जमीनीत भात पिकासाठी 25 कि ZnSo4 प्रती हेक्टरी द्यावे.

 3. मध्यम काळ्या जमीनीच्या काळ प्रकल्पामध्ये खरीप आणि रब्बी भात लागवडी मध्ये असे आढळून आले की खरीप भातासाठी 50 टक्के शिफारस केलेल्या खताची मात्राम्हणजेच (50 कि. नत्र + 25 किलो सफुरद + 25 किलो पालाश) प्रती हेक्टरी रासायनिक खतातून दिले + ऊरलेले 50 टक्के शिफारस केलेल्या खताची मात्रा ही गिरीपुष्पाच्या पानातून दिले किंवा शेणखत यामधून दिले आणि रब्बि भात लागवडीसाठी 100 टक्के शिफारस केलेल्या खताची मात्रा दिले म्हणजेच (100 किलो नत्र +50 किलो सफुरद + 50 किलो पालाश प्रती हेक्टरी )

 4. दक्षीण कोकण विभागातील भात भुईमुग पिक पध्दतीमध्ये खरीप भातामध्ये 10 मेट्रीक टन राणमोडी हिरवळीचे खत + त्यासोबत 25 किलो नत्र + 50 किलो पालाश द्यावे. व त्यानंतर रब्बी भुईमुगासाठी 100 किलो स्फुरद प्रती हेक्टरी वापरावे.

 5. मध्याम काळ्या जमीनीतील काळ प्रकल्पामध्ये खरीप भाताची (KJT-3) नावाच्या जातीची लागवड शिफारस केलेल्या रोप लागवड पध्दतीच्या वापर करुन किंवा 36 ते 48 तासात रहू पध्दतीने तयार केलेले उगविलेले बियाणे चिखलणी केलेल्या राणामध्ये आठओळ पध्दतीने ड्रमसिडरच्या वापर करुन 22.5 से.मी दोन ओळीतील अंतर ठेवून लागवड करावी.

 6. भाताच्या शेतातील मातीची सुपीकता जपण्यासाठी व पिकाच्या जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी प्रमाणीत केलेल्या रासायनीक खताची मात्रा 25 टक्के ने कमी करुन त्याच्या ऐवजी सेंद्रीय खताची मात्रा द्यावी त्यासाठी शेणखत, कोंबडीखत, मासळीखत, निंबोळीखत हे सम प्रमाणात घ्यावे व 2 टन प्रती हेक्टरी वापरावे.

   

  धान पिकास प्रति हेक्‍टरी 100 :50 :50 किलो अनुक्रमे नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. 1/2 नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश चिखलणीच्या वेळी 109 किलो युरिया + 312 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 84 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या माध्यमातून द्यावे; तथा 25 किलो नत्र (54 किलो युरिया) फुटवे फुटण्याच्या वेळी आणि 25 किलो नत्र (54 किलो युरिया) लोंबी येण्याच्या सुरवातीस द्यावे.

   

  कर्जत भात संशोधन केद्राद्वारे संकरीत भात बीजोत्पादन कार्यक्रमासाठी अशी शिफारस करण्यात येत आहे की.

  1)      मादी वाणाच्या ६ ओळी आणि नर वाणाच्या २ ओळी लावल्या असता खरीप हंगामात ८ ते १० क्विंटल प्रती हेक्टरी तर रबी-उन्हाळी हंगामामध्ये १२ ते १५ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन मिळते. मादी वाणांचे अंतर १५ बाय १५ से.मी. आणि नर वाणांचे अंतर ३० बाय १५ सेमी ठेवावे. मादी व नर वाणातील अंतर ३० सेमी. ठेवावे.

  2)     मादी वाणाची लोंबी ही शेंडे पानांवर सुमारे ४० टक्के गुडाळली गेल्याने ती पुर्णतः शेंडे पानाच्या बाहेर येऊन लोंबीतील सर्व दाण्यामध्ये परपरागीभवन व्हावे. या दृष्टीने ६० पी.पी.एम. तीव्रतेचेत जिब्रँलीक आम्ल पीक फुलो-यात आल्यानंतर फवारावे. यापैकी पहिली फवारणी पीक ५ टक्के फुलो-यावर आल्यानंतर करावी आणि दुसरी फवारणी दुस-या दिवशी करावी.

  3)     भाताची पुनर्लागवड २० बाय २० से.मी. अंतरावर सुधारीत पध्दतीने करून युरीया ब्रिकेटद्वारे (गोळ्या) ५६ किलो नत्र एकाच हप्त्यात प्रती हेक्टर द्यावे. अशी शिफारस पश्चीम घाट विभागासाठी करण्यात येत आहे.

  4)     पश्चीम घाट विभागातील इंद्रायणी या भाताच्या वाणाचे जास्तीत जास्त धान्य उत्पादन येण्यासाठी चिखलणीचेवेळी १० टन गिरीपुष्प पाला प्रती हेक्टरी टाकावा. पिकास शिफारस केल्याप्रमाणे हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. व पुनर्लागण १५ बाय १५ से.मी. अंतरावर करावी.

  5)    उप पर्वतीय विभागातील पर्जन्यगट – ७ मधील ब प्रकारच्या जमिनीमध्ये पुसा बासमती-१ या भात वाणाच्या धान्य व पेंढ्याच्या अधिक उत्पादनाकरीता रोप पुनर्लागण १५ बाय १५ से.मी. अंतरावर करून हेक्टरी १०० किलो स्फुरद व ५० किलो पालाश आणी १० टन गिरीपुष्प पाला जमिनीमध्ये गाडावा अशी शिफारस करण्यात येत आहे.

   

  1) मध्यम काळ्या जमिनीत सह्याद्री भात जातीसाठी खताची मात्रा १५०.७५.५० (नत्र, स्फुरद, पालाश) किलो प्रती हेक्टर अधिक गिरीपुष्प पाला ७ टन प्रती हेक्टर द्यावा. दक्षिण कोकण विभागामध्ये (फोंडाघाट) १०० किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद अधिक ५० किलो पालाश प्रती हेक्टरी खताची मात्रा द्यावी. १५ बाय १५ से.मी. अंतर ठेवून लावणी करावी.

  2) पनवेल १-८-५-१७-२ हा वाण खार जमीन संशोधन केंद्र पनवेल या केंद्राने दामोदर आणि पंकज यांचे संकरातून विकसीत केला आहे. हा वाण क्षार प्रतिकारक असून जास्त उत्पादन देणारा असल्याने खार जमीन क्षेत्रासाठी ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी प्रसारीत करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

  3) रोप उगवणपूर्वी भात रोपवाटीकेवर तणांचा चांगल्या व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बंदोबस्त करण्यासाठी खरीप हंगामात रोपवाटीकेच्या वाफ्यावर ऑक्साडिझोन प्रती हेक्टरी ०.४ किलो (क्रियाशील घटक) ची फवारणी द्यावी.

  4) भाताने जास्तीत जास्त धान्य उत्पादन व निव्वळ आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रती हे. १००.५०.५० किलो प्रती हेक्टर अनुक्रमे नत्र, स्फुरद, पालाश, द्यावे. तसेच स्फुरद खत डायअमोनियम फॉस्फेट किंवा रॉक फॉस्फेट स्वरुपात जीवाणू संवर्धनाचा समावेश करून द्यावे.

  5) उशिरा तयार होणा-या सुवासित भाताचे खरीप हंगामात जास्त उत्पादन मिळविण्यासाठी पुनर्लावणी २० बाय १५ सें.मी. ऐवजी १५ बाय १५ से.मी. अंतरावर करण्याची शिफारस पूर्ण विदर्भ विभागासाठी करण्यात येत आहे.

  6) पश्चिम महाराष्ट्रातील पर्वतीय (घाट) क्षेत्रात भात पिकांच्या अधिक उत्पादनासाठी हेक्टरी ५६ कि.ग्रँ. नत्र आणि ३० कि.ग्रँ. स्फुरद अनुक्रमे युरीया आणि डायअमोनीयम फॉस्फेटच्या गोळ्यांच्या एकत्रीत स्वरुपात एकाच हप्त्यात लागणीच्या वेळी १५ बाय २५ सें.मी. अंतरावर द्यावे.

  7) मध्यम काळ्या जमिनीत सह्याद्री या संकरीत भाताची रोपे तयार करण्यासाठी साळींच्या भुश्याची राख एक किलो प्रती चौ.मी. डाय अमोनियम फॉस्फेट युक्त युरियाची चार रोपाच्यामध्ये ७-१० से.मी. खोलीवर एक गोळी, ओळीत रोप लावणीच्या पध्दतीचा वापर (२० बाय २० सें.मी. अंतरावर लावणी आणि रोप संख्या २५ प्रती चौ.मी.) आणि ३ टन प्रती हेक्टर गिरीपुष्पाचे हिरवळीचे खत अशा चतुःसुत्रीचा वापर केल्यास भाताच्या उत्पादनात वाढीसाठी दिलेल्या खताचा सक्षम उपयोग होण्यासाठी, खताची बचत करण्यासाठी जमिनीची चिरकाल उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आणि जंगल संपदेची जपणूक करण्याची एकात्मिक भात शेती तंत्रज्ञानाची शिफारस करण्यात येते..

  8) कोकणातील जांभ्या दगडापासून तयार झालेल्या मातीत बासमती भाताच्या अधिकाधिक उत्पादनासाठी ५० किलो नत्र युरीयाच्या स्वरुपात आणि गिरीपुष्पाचा हिरवा पाला १० टन प्रती हेक्टर वापण्याची शिफारस करण्यात येत आहे.

   

  पूर्व विदर्भ विभागातील हळव्या किंवा निमगरव्या कालावधीच्या भाताच्या जातीकरीता १२५ किलो नत्र प्रती हेक्टरी व गरव्या जातीसाठी १५० किलो नत्र प्रतीहेक्टरी (५० टक्के रोवणीच्या वेळी, २५ टक्के फुटवे येण्याच्या अवस्थेत व २५ गर्भी अवस्थेत) देण्याची शिफारस करण्यात येते.

   

  धान पिकाचे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर उत्पन्नासाठी शिफारस केलेल्या खत मात्रेच्या तीन चतुर्थांश म्हणजे ७५ किलो स्फुरद व ३७.५ किलो पालाश प्रती हेक्टर खत मात्रे सोबत प्रेसमेड केक हे ५ टन चिखलणीच्या वेळी देण्याची शिफारस करण्यात येत आहे.

  1) जांभ्या जमिनीत संकरीत भाताचे (सह्याद्री) अधिक उत्पादन मिळविण्यासाठी गिरीपुष्प हे हिरवळीचे खत प्रतीहेक्टरी पाट टन आणि नत्र, स्फुरद आणि पालाश अनुक्रमे १५०.५०.७५ कि.प्र.हे. द्यावे. भात लावतेवेळी नत्राची अर्धी मात्रा तसेच स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा द्यावी. उरलेला नत्राचा अर्धा हप्ता समान विभागून भात लावणीनंतर एक-एक महिन्याच्या अंतराने द्यावा. (को.कृ.वि.दापोली)

  2) पालघर १०३-१-२ (पालघर-२) आयईटी-१६०९२ हा वाण कोकण विभागात प्रसारीत करण्यास शिफारस करण्यात आली आहे. हा वाण निमगरवा प्रकारातील असून दाणा आखूड बारीक आहे. हा झिनीया-६३ या जातीपेक्षा २६ टक्के इतके जास्त उत्पन्न देणारा असून मध्यम उंचीचा असून या वाणाने कोळंबा – ५४० या जातीपेक्षा ३० टक्के इतके जास्त उत्पादन नोंदविले आहे. (को.कृ.वि.दापोली)

  3) कृषि संशोधन केंद्र सिंदेवाही येथून धानाची मध्यम कालावधीची (१३०-१३८ दिवस) सिंदेवाही-२००१ (सिंदेवाही-१४-९-८) ही जात महाराष्ट्रासाठी ओलिताच्या भागासाठी प्रसारणाकरीता विद्यापीठ स्तरावरून मान्य केलेली आहे. ही जात ४५-५० क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन देत असून ठेंगू व न लोळणारी आहे. ह्या जातीला सर्वदूर स्वीकृती असून (बिहार, ओरीसा, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड इ.) दाणा आखूड, जाड आहे. ही जात पांढ-या पाठीचे तुडतुडे, तपकिरी तुडतुडे व गादमाशीला प्रतिकारक असून करपा रोगाला प्रतिकारक व कडाकरपा रोगाला साधारण प्रतिकारक आहे. ह्या जातीच्या तांदूळाचा उतारा ७३.१ टक्के तर पूर्ण तांदूळाचे प्रमाण ६८.५ टक्के आहे. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  4) भाताचे (इंद्रायणी) अपेक्षीत उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने प्रयोग घेण्यात आला होता. या प्रयोगावरून माती परिक्षण करून भात पिकास द्यावयाचे नत्र, स्फुरद आणि पालाश त्यांचे खालीलप्रमाणे सुत्र विकसीत करण्यात आले.

   

  खतामधून द्यावयाचे नत्र (कि/हे.) = (५.२०Xअपेक्षीत उत्पादन)-(०.३४Xजमिनीतील उपलब्ध नत्र कि.प्र.हे.)

  खतामधून द्यावयाचे स्फुरद (कि/हे.) = (९.४०Xअपेक्षीत उत्पादन)-(१३.६६Xजमिनीतील उपलब्ध स्फुरद कि.प्र.हे.)

  खतामधून द्यावयाचे पालाश (कि/हे.) = (२.७३Xअपेक्षीत उत्पादन)-(०.१६Xजमिनीतील उपलब्ध पालाश कि.प्र.हे.)

  (म.फु.कृ.वि.राहुरी)

  5) जमिनीच्या भौतीक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी १०० किलो नत्रांपैकी ५० किलो नत्र युरीयाद्वारे व ५० किलो नत्र गांडूळ खताद्वारे किंवा ग्लिरिसीडीया (गिरीपुष्प) द्वारे किंवा निंबोळी ढेपद्वारे (५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश सई, देण्याची शिफारस करण्यात येते. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  6) पूर्व विदर्भ विभागाच्या मध्यम प्रकारच्या जमिनीत आर्थिकदृष्ट्या किफायतशीर उत्पादनाकरीता रासायनिक खताची १२५,६२.५,६२.५ किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टर मात्रा धानाच्या संकरीत तसेच अधिक उत्पादन देणा-या वाणांकरीता शिफारस करण्यात येते. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  7) आर्थिकदृष्ट्या किफायतशीर उत्पादनाकरीता पूर्व विदर्भ विभागात सह्याद्री या संकरीत धानाची रोवणी २० बाय २० सें.मी. व एक रोप प्रती चूड लावून करण्याची शिफारस करण्यात येते. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  8) पूर्व विदर्भ विभागात पावसात खंड पडल्यास धान पिकाच्या अधिक उत्पादनाकरीता ब-याच दिवसांचे अंतराने संरक्षीत ओलीत देण्याची शिफारस करण्यात येते. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  9) मध्यम काळ्या जमिनीत खरीप भात पिकास शिफारस केलेल्या नत्र खताच्या मात्रेच्या ५० टक्के नत्र हे रासायनिक खताद्वारे तर उर्वरीत ५० टक्के नत्र हे गिरीपुष्प हिरवळीच्या खताद्वारे दिली असता दोन्ही हंगामातील एकूण भात उत्पादन व निव्वळ नफा अधिक मिळतो. (को.कृ.वि.दापोली)

  10) उत्तर कोकण किनारपट्टीच्या मध्यम काळ्या जमिनीत खरीप भाताचे किफायतशीर उत्पन्न मिळण्यासाठी प्रचलीत पध्दतीला पर्याय म्हणून ३६ ते ४८ तास कालावधीत मोड आलेल्या भात रोपांची लावणी (रहू) ८ ओळिच्या ड्रमसीडर ने चिखलणी केलेल्या शेतात २२.५ सें.मी. अंतरावर करावी. निव्वळ नफ्याचा विचार करता प्रचलित लावणी पध्दतीस ड्रमसीडरच्या सहाय्याने चिखलणीवर पेरणी करणे एक पर्यायी पध्दत होऊ शकते. (को.कृ.वि.दापोली)

  11) खरीप धानाच्या अधिक उत्पादन आणि आर्थिक मिळकतीसाठी शिफारशी स्फुरद व पालाश खत मात्रे सोबत रोवणीचे वेळी २५ टक्के नत्र गिरीपुष्पाद्वारे आणि ७५ टक्के नत्र युरियाद्वारे द्यावे. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  12) धानाचे अधिक उत्पादन, आर्थिक मिळकतीसाठी शिफारशीत खतेमात्रेसोबत गराडीचा पाला १.५ टन प्रती हेक्टरी लागवडीच्या वेळी द्यावे. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  13) आपत्कालीन परिस्थितीत धानाची रोवणी शक्य नसल्यास चिखलणी केलेल्या शेतात मोड आणलेले ५० किलो बियाणे प्रती हेक्टरी फोकण पध्दतीने पेरण्याची शिफारस करण्यात येत आहे. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  14) उत्तर कोकण किनारपट्टीच्या काळ प्रकल्पांतर्गत मध्यम काळ्या (मानक) स्त्री-उन्हाळी भाताचे किफायतशीर उत्पादन आणि अधिक निव्वळ नफा मिळण्यासाठी कर्जत-३ भात लागवडीच्या प्रचलीत पध्दतीला पर्यायी पध्दत म्हणून ६० ते ७२ तास कालावधीचा मोड आलेल्या (रहू) भाताची पेरणी आठ ओळीच्या (भात संशोधन संचालनालय, हैद्राबाद यांनी विकसीत केलेल्या) ड्रमसीडरने चिखलणी केलेल्या शेतात २२.५ सें.मी. अंतरावर करावी. (को.कृ.वि.दापोली)

  15) दक्षिण कोकण किनारपट्टीवर जांभ्या जमिनीत सह्याद्री संकरीत खरीप हंगामात सर्वाधिक उत्पादन, मिळकत आणि निव्वळ नफा मिळण्यासाठी २० दिवसाच्या रोपांची प्रतीचुडात एक याप्रमाणे २० बाय १५ सें.मी. अंतरावर लावणी करावी आणि प्रती हेक्टरी १५० किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद अधिक ५० किलो पालाश या खतांची मात्रा द्यावी. (को.कृ.वि.दापोली)

  16) नत्र व स्फुरदाची ४० टक्के बचत करण्यासाठी भात उत्पादनात १७० कि.प्र.हे. युरिया डीएपी ब्रिकेटस (६२५००) ब्रिकेटस प्रत्येकी २.७ ग्रँम) काळ्या जमिनीमध्ये रोवणीच्या वेळी वापरण्याची शिफारस करण्यात येते. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  17) इंद्रायणी भाताच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस मात्रेच्या ७५ टक्के नत्र व स्फुरद (७५ किलो नत्र व ३७.५० स्फुरद प्रती हेक्टर) युरिया डीएपी. ब्रिकेट गोळ्याद्वारे व ५० किलो पालाश प्रती हेक्टर देवून भात पेंढा २ टन प्रती हेक्टर व गिरीपुष्प (ग्लिरीसिडीया) वनस्पतीचा पाला ३ टन प्रती हेक्टरी वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)

  18) पूर्व विदर्भ विभागात भात पिकाचे अधिक उत्पादन आणि आर्थिक मिळकतीसाठी आणि जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी ५० टक्के शिफारस केलेल्या खतमात्रे सोबत ५ टन प्रती हेक्टर बायोगँस (४७.२३.२५ कि.नत्र.स्फुरद पालाश प्रती हेक्टर) देण्याची शिफारस करण्यात येते. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  19) पूर्व विभागात बासमती भाताचे अधिक उत्पादन व अर्थिक मिळकतीसाठी गिरीपुष्पाचा पाला किंवा गांडूळ खत किंवा बायोगँस स्लरी १० टन प्रती हेक्टर रोपणीच्या वेळेस देण्याची शिफारस करण्यात येते. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  20) भात पिकांच्या अधिक उत्पादनासाठी व जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी १५.२५.१३ किलो नत्र स्फुरद पालाश प्रती हेक्टरी (१.५८ टन प्रती हेक्टर) कोंबडीचे खताद्वारे अधिक ५०.२५.३७ कि. नत्र स्फुरद पालाश प्रती हेक्टर. रासायनिक खताद्वारे देण्याची शिफारस करण्यात येत आहे. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  21) पूर्व विदर्भ विभागातील पिकांच्या उत्पादनातील घट कमी करण्यासाठी शेततळे तयार करून त्याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक व पुनर्भरणाने विहीरीच्या पाण्याची पातळी वाढवून त्या पाण्याचा उपयोग पिकाला पाण्याचा ताण असतांना संरक्षीत ओलीत देण्याची शिफारस करण्यात येत आहे. ( डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)