गवती चहाची लागवड

गवती चहासाठी निचरा होणारी, पोयट्याची किंवा रेताड जमीन योग्य असते. या गवताच्या कठीणपणामुळे विविध प्रकारच्या हलक्‍या ते भारी जमिनीत हे पीक घेता येते. केरळमध्ये हे गवत, बरड व उताराच्या जमिनीवर लावतात, त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते. हे पीक एकाच जमिनीवर एकदाच लावल्यानंतर तीन ते पाच वर्षांपर्यंत राहते, त्यामुळे सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे खरिपामध्ये लागवड करावी. त्यासाठी मार्च ते एप्रिल महिन्यात उभी व आडवी खोल नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीस शेणखत/कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

लागवडीसाठी ठोंबापासून, तसेच बियांपासून रोपे मिळविता येतात, परंतु सर्व बाबींचा विचार करता ठोंबापासून केलेली लागवड योग्य ठरते. त्यासाठी सरी-वरंब्यावर लागवड केल्यास फायदेशीर ठरते. सरी पाडताना 75 सें.मी. अंतरावर सरी पाडावी व नंतर 45 सें. मी. अंतरावर ठोंबाची लागवड करावी. लागवडीसाठी लागणारे ठोंब 20-25 सें.मी. उंचीचे व एक ते दोन वर्ष वयाचे असावेत. पर्णोत्सर्जन टाळण्यासाठी ठोंबांची टोकाकडील पाने छाटून टाकावीत. अंतराचा विचार करता हेक्‍टरी 30 हजार ठोंबे लागतात. नियमित सिंचनाची सोय असणाऱ्या जमिनीत वर्षातून कधीही लागवड करण्यास हरकत नाही. हे पीक बहुवर्षीय असल्यामुळे रोपे मेलेल्या जागेत सतत नांगे भरावे लागतात.

सुधारित वाण –
केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था – प्रगती, प्रमाण, कावेरी, कृष्णा, चिरहरित व निमा.
ओडाकल्ली- केरळ येथील संशोधन केंद्र- ओडी- 19, ओडी- 23 व ओडी-

440
जम्मू-काश्‍मीरच्या संशोधन केंद्र- सी.के. पी.- 25 व आर.आर.एल.- 16
जोरहटच्या संशोधन केंद्र- जी.आर.एल.- 1

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी- सी.के.पी.- 25 या जातीची महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली आहे. या जातीची पाने गर्द हिरव्या रंगाची, कमी रुंदीची, पाण्याचा ताण सहन करणारी व त्याचप्रमाणे सिट्रॉलचे प्रमाण जास्त असणारी आहे.

या पिकासाठी माती परीक्षणानुसार खतांचा वापर करावा. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर प्रति हेक्‍टरी 20 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. लागवडीच्या वेळी 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश द्यावे. प्रत्येक काढणीनंतर हेक्‍टरी 40 किलो नत्राचा हप्ता द्यावा व ताबडतोब पाणी द्यावे. लागवडीनंतर लगेच पाणी देणे आवश्‍यक असते. ऋतुमानानुसार पाणी व्यवस्थापन करावे. हिवाळ्यात 12 ते 15 दिवसांनी व उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे. उन्हाळ्यात पाण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाण्याचा ताण बसल्यास तेलाचा उतारा कमी मिळण्याची शक्‍यता असते. पावसाळ्यात आवश्‍यकता असल्यास पाणी द्यावे. या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. त्या वेळी पीक पहिले दोन-तीन महिने तणविरहित ठेवणे अत्यावश्‍यक आहे, त्यामुळे लावलेल्या रोपांची चांगली वाढ होऊ शकेल. त्याचप्रमाणे प्रत्येक काढणीनंतर एक खुरपणी करावी, म्हणजे वरची जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहण्यास मदत होते.

धोतरा

धोतरा (datura alba)
जुन्या भारतीय लिखाणात याचा ‘शिवशेखर’ या नावाने संदर्भ आलेला आहे. धोतऱ्याच्या फुलाचे भगवान शंकराशी नाते असल्याचे गृहीत धरण्यात आलेले आहे.
वर्णन
१ मीटर उंचीपर्यंत वाढणारे झुडूप, पाने मोठी अंडाकृती, दातेरी, फुले फार मोठी पांढरी, फळ अंडयाचे आकाराचे, चार भागात विभागलेले, लांब किंवा आखूड काटयानी व्यापलेले.
वितरण
हे झाड समशीतोष्ण हिमालयात, २५०० मीटर उंचीवर आणि मध्य व दक्षिण भारताच्या डोंगराळ भागात सापडते.
औषधगुणधर्म
वाळलेली पान, फुले असलेल्या फाद्यांचे शेंडे आणि बिया म्हणजेच धोतरी औषध आहे.

‘हायोसायामिन’ हे पानातील मुख्य आणि महत्वाचे क्रियाशील तत्व आहे म्हणून हे औषध बेलाडोना किंवा हायोसायामसारखे उपयोगी आहे. हे औषध फुप्फुसाच्या नळया सुजण्यावर, दम्यावर आणि तोंडातील लाळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी आहे. तसेच स्नायूंच्या झटक्यांवर नियंत्रण ठेवण्यासही या झाडांची पाने जाळून धूर नाकाने आत घेतल्यास दम्यावर आराम पडतो. बियांमध्येसुध्दा हायोसायमिन्‌ असल्याने पानासारखेच औषधी गुणधर्म आहेत.
इतर जात
डटुरा या प्रजातीच्या डटुसरा मेटल ही ओसाड जागेवर भारतात सगळीकडे सापडते. तिची फुले पांढरी किंवा पिवळसर आणि बऱ्याचवेळा बाहेरील बाजूस जांभळी असतात. फळावर आखूड काटे असतात. बागेत लावलेल्या झाडांच्या फुलांना दलपुंज्याची दोन मंडले असतात. जास्त दूध सुटल्याने सुजलेल्या स्तनांना याच्या पानांचे पोटिस बांधल्यास सूज उतरते.

धिंगरी अळिंबी

धिंगरी अळिंबीची लागवड शेतातील पिकांच्या मळणीनंतर उरलेल्या काडांवर व पालापाचोळ्यावर करता येते. त्यासाठी भात, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे व पाने, मक्‍याची कणसे, भुईमुगाच्या शेंगांची टरफले यांचा वापर करावा. लागवडीसाठी चालू हंगामातीलच काड वापरावे. ते पाण्याने भिजलेले नसावे. जुने तसेच भिजलेले काड वापरल्याने अळिंबीवर सूक्ष्म जिवाणूंची वाढ होऊन बुरशी लागते, त्यामुळे कमी उत्पादन मिळते. लागवडीच्या आदल्या दिवशी दोन ते तीन सें.मी. लांबीचे काडाचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात आठ ते दहा तास भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी काडाचे पोते पाण्यातून काढून काडातील जास्तीत जास्त पाणी काढावे, त्यानंतर भिजलेल्या पोत्याला 80 अंश से. तापमानाच्या वाफेवर एक तास ठेवून भिजवलेल्या काडाचे निर्जंतुकीकरण करावे. ही प्रक्रिया केल्यानंतर काड पोत्यातून बाहेर काढून त्यात असणाऱ्या पाण्याचा निचरा करावा. अळिंबी तयार करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या पाच टक्के फॉर्मेलीनमध्ये बुडवून निर्जंतुक कराव्यात. पिशवीत काड भरताना प्रथम आठ ते दहा सें.मी. जाडीचा थर द्यावा व त्यावर अळिंबीचे स्पॉन पसरावे. स्पॉनचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या दोन टक्के घ्यावे. पिशवीत काड व स्पॉन यांचे चार ते पाच थर भरताना तळहाताने दाबून भरावे. भरलेल्या पिशवीचे तोंड दोऱ्याने घट्ट बांधून पिशवीच्या पृष्ठभागावर सुई किंवा टाचणीने छिद्रे पाडावीत. पिशव्या निवाऱ्याच्या ठिकाणी ठेवाव्यात. 10 ते 15 दिवसांत पिशवीच्या आतील पृष्ठभागावर बुरशीची पांढरट वाढ झालेली दिसते, तेव्हा त्यावरील पिशवी काढून टाकावी. काडावर बुरशीची वाढ झाल्याने त्यास ढेपेचा आकार येतो, यास “बेड’ म्हणतात. या बेडवर दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. अळिंबीची चांगली वाढ होण्यासाठी खेळती हवा व भरपूर प्रकाश यांची गरज असते. त्यासाठी बेड ज्या खोलीत ठेवले असतील, त्या खोलीचे तापमान नियंत्रित करावे. तीन ते चार दिवसांत बेडच्या सभोवताली अंकुर दिसू लागतात व त्यापुढील तीन-चार दिवसांत अळिंबीची वाढ होऊन ती काढण्यासाठी तयार होते.

दालचिनी

दालचिनी (Cinnamomum zeylanicum)
झिलॅनिकम हे शास्त्रीय नाव सिलोनशी संबंधीत आहे, या ठिकाणी हे झाड नैसर्गिक अवस्थेत वाढते.
वर्णन
हे सदाहरित झाड आहे. वर्षभरात कधीही यांचे पाने गळून पडत नाहीत व ६ ते ८ मीटर उंच वाढते. पाने अंडाकृती, जाड कातडयासारखी, अग्रास टोकदार, चकाकी असणारी खालच्या भागात फिकट हिरवी पानांच्या मुख्य शिरा पानाच्या पायापासून ते मध्यापर्यंत येणाऱ्या, फुले लहान, मोठया केसाळ गुच्छात, फळ लांबट किंवा अंडाकृती सुमारे १.५ ते २ से. मी. लांब, गर्द जांभळे, एक बीजी.
वितरण
हे झाड दक्षिण भारतात समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर उगवते, तसेच २००० मीटरपेक्षा कमी उंचीवरसुध्दा थोडया भागात नियमित आढळते. भारताच्या काही भागात त्याची लागवडही केली जाते.
औषधगुणधर्म
झाडाच्या फांद्या तोडून त्यांची साल काढण्यात येते, आतली कोरडी साल म्हणजे दालचिनी आहे. ते अतिसार, मळमळ आणि वांत्यावर वापरले जाते. सर्वसाधारणपणे ते मसाला म्हणून वापरले जाते. सालीपासून सिनॅमॉन नावाचे तेल काढण्यात येते. या तेलाचे गुणधर्म सालीच्या गुणधर्माप्रमाणेच आहेत पण काही बाबतीत ते सालीपेक्षा सरस आहेत. पोट दुखणे, पोटात वायु होणे यावर वापरले जाते, तसेच काही प्रकारचे जंतू व बुरशीनाशक गुणधर्मसुध्दा आहेत. पानातून काढलेले तेल रूचिवर्धक आणि संरक्षणशील म्हणून मिठाई, साबणे वगैरेत वापरतात. काही प्रकारच्या संधिवातात दुखत असलेल्या जागेवर लावण्यासाठी उपयोग करतात.
इतर जात
सिनॅमॉमम कॅम्फोरा ची लागवड भारतात निलगिरी पर्वतात व उत्तर भारतातील वनस्पत्योद्यानात होते. पाने व लाकडाच्या उर्ध्वपतनाने या झाडापासून कापूर मिळतो. मुख्यत: मुडपणे, सुजणे आणि संधिवातामुळे होणारे दु:ख यावर वरून लावण्यासाठी कापूर वापरतात. यास काही प्रकारच्या अतिसारात पोटातूनही देण्यात येते किंवा हृदयाचे उत्तेजक म्हणूनही वापरतात. कापूर आणखी अनेक प्रकारे वापरतात आणि दरवर्षी ५००० क्विंटल्सपेक्षा जास्त कापूर भारतात आयात होते. (आता विशेष प्रकारच्या ऑसिममच्या जातीपासूनसुध्दा कापूर काढण्यात येतो. त्या प्रजातीत तुळशीचा समावेश होतो.) सिनॅमॉमला टॅनेला (तमालपत्र) मध्य हिमालयात, आसाम व बंगालच्या भागात सापडते. पाने मुख्यत: मसाला म्हणून वापरतात, पंरतु पोटातील वायुवर अतिसारातसुध्दा वापरतात.

दारूहळद

मोठे काटेरी क्षुप, काष्ट पिवळे, शाखा पांढुरक्या किंवा फिकट करडया रंगाची पाने विशेष प्रकारची शाखीय किंवा अशाखीय कंटकाच्या अक्षकोनातून निघणारी कातडी पोताची कडा बहुतेक टोकदार दातेरी, शिरा बारीक, फुले पिवळी छोट्या समूहात, फळ अंडाकृती, निळसर जांभळे, बिया थोडया.
वितरण
हे झाड हिमालयात २००० ते ३००० मीटर उंचीवर सापडते, ते दक्षिण भारतात निलगिरीच्या डोंगरात सुध्दा उगवते.
औषधगुणधर्म
या झाडाच्या किंवा या प्रजातीतील जवळच्या बरबेरिस एशियाटिका Roxb आणि बरबेरिस लायसियम Royle म्हणतात या औषधातील मुख्य घटक म्हणजे ‘बरबेरिस’ या जातीच्या मुळ्यांच्या भुकटीस ‘बरबेरिस’ ऍल्कलॉईड आहे मुळयांची साल, मुळे आणि खोडाचा खालचा भाग पाण्यात उकळला जातो, त्यास नंतर उकळून अर्धवट घट्‌ गोळा होइपर्यंत बाष्पीभूत करण्यात येते. या अर्धवट गोळयास ‘रसौत’ असे म्हणतात. रसौत पाण्यात विरघळते. हे लोणी व तुरटीत मिसळून किंवा अफू व मोसंबीच्या रसात मिसळून डोळे येण्यावर किंवा डोळ्याच्या इतर आजारांवर बाहेरून पापण्यांवर लावण्यात येते. हे गळूच्या काठावरून इंजेक्शनद्वारेसुध्दा आत सोडण्यात येते.

रसौत ज्वरनाशक, सौम्या रेचक, आणि शक्तिवर्धक म्हणून वापरले हाते. पोटाच्या विकारात ते उपयोगी आहे, आणि सशांवर केलेल्या प्रयोगांनी त्याच्या कॉलरा व अतिसारातील वापराची खात्री पटलेली आहे. हे औषध हिवतापात पण वापरत असत पण या आजारात ते फारसे गुणकारी नसल्याचे सिध्द झाले आहे, तथापि ते हिवतापाची सुरवात समजण्यास मदत करते. श्वसन व हृदय यांची गती या औषधाने मंदावते हे सुध्दा प्रयोगाद्वारे दाखवण्यात आले आहे या औषधात क्षयविरोधी गुणधर्म असल्याचे सांगण्यात येते.

तुळशी (Oscimum sanctum)

हे भारतीयांचे प्रसिध्द आणि पवित्र झाड आहे. ती बहुशाखीय ताठ – सरळ, ७५ सेमी. पर्यंत वाढणारी औषधी आहे, सर्व अवयव केसयुक्त, पाने संमुख, सुमारे ५ सेमी. लांब, कडा दातेरी किंवा साध्या, वरच्या व खालच्या पृष्ठभागावर केंसाळ, बारिक ग्रंथीच्या ठिपक्यांनीयुक्त, सुवासिक, फुले लहान, जांभळट किंवा तांबुसआरक्त, लहान दाट, गुच्छ, सडपातळ कणिसात, फळे लहान बिया पिवळसर किंवा तांबूस-आरक्त.
वितरण
हे झाड भारतात सगळीकडे, घरांमध्ये, बागामध्ये आणि मंदिरामध्ये लावले जाते. बऱ्याच जागी ते जंगली स्वरूपातही उगवते.
औषधगुणधर्म
या झाडाची पाने आणि बिया औषधी आहेत. पानांपासून काढलेल्या तेलात जीवाणू व कीटाणू नष्ट करण्याचा गुणधर्म आहे. पानांचा काढा किंवा रस फुफ्फूसाच्या नळ्या सुजण्यावर, पडशावर, पचनाच्या विकारात उपयोगी आहे. ते त्वचारोगावर व नायट्याच्या जागी लावण्यात येते. पानाच्या रसाचे थेंब कर्णशूल थांबविण्यासाठी कानात टाकण्यात येतात. पानांचा काढा घरगुती उपाय म्हणून सर्दी पडशासाठी नेहमी वापरण्यात येतो. बिया मूत्र उत्सर्जन संस्थेच्या रोगावंर उपयोगी आहेत. मलेरियाच्या ज्वरात घाम येण्यासाठी तुळशीच्या मुळांचा काढा देण्यात येतो.

तमालपत्र (Taxus baccata)

वर्णन

मीटर उंचीचे व १० मीटर परिघाचे, नेहमी हिरवेगार असलेले वृक्ष. फांद्या समांतर, टोकाचा भाग गोलाकार. नवीन फांद्या बारीक, करडया रंगाची लव असलेल्या आणि खालच्या बाजूस वळलेल्या.
पर्ण
२.५ ते ५ सेमी. लांब व .२५ सेमी. रूंद, चपटे, रेखाकार, ताजे असता हिरवे, वाळल्यावर पिवळे व चमकदार, टोकास वाकडे, कठीण आणि तीक्ष्ण शेंडा असलेले. वृक्षावर पाने ८ ते १० वर्षे टिकतात. फाद्यांना वेढून पाने फुटतात पण ती दोन रांगांमध्ये उगवल्याप्रमाणे भासतात.
फळ
१० ते १५ सेमी लंब गोलाकार, ४ ते ७ सेमी व्यासाचे निळया किंवा वांगी रंगाचे, वर्षाने पिकणारे. बीज १ ते २.५ सेमी लंब, पंखयुक्त. सिक्कीम, भूतान, कुमाऊँ, अफगाणिस्तान, बलुचिस्तान इ. हिमालयाच्या ३ ते ४ हजार फूट उंचीपर्यंतच्या प्रदेशात.
औषधगुणधर्म
तीक्ष्ण, उष्ण, व सस्निग्ध असल्याने कफ नाहीसा करतो आणि मधुर अनुरस असल्याने वातघ्न राजयक्ष्मा व शोष या व्याधी बरे होण्यास मदत होते. अरूची, अजीर्ण, श्र्वास, कास, अतिसार, पण्डुरोग व संग्रहणीत तमालपत्राचे चूर्ण वापरावे. त्यात तमालपत्र १ भाग, मिरी २ भाग, सूंठ ३ भाग, पिंपळी व वंशलोचन प्र २ भाग, वेलची आणि दालचिनी प्रत्येकी अर्धाभाग आणि पिठीसाखार ३२ भाग आहे.

ज्येष्टमध (Yashtimadhu)

वर्णन
१ ते ५ मीटर उंचीचे बहुवर्षायू क्षुप. मूळ लांबट, लालसर पिवळे किंवा धुरकट रंगाचे, मुळाची साल काढल्यावर पिवळ्या रंगाचा व धाग्यांनी युक्त गाभा. पर्ण संयुक्त पर्णदल अण्डाकार. पर्णदलाच्या ४ ते ७ जोडया असतात. पुष्प गुलाबी किंवा वांगी रंगाचे, फळ सुमारे २.५ सेमी. लांबीच्या चपट्या शेंगांच्या स्वरूपात प्रत्येक शेंगात २ ते ३ वृक्‍काकार बिया असतात.
औषधगुणधर्म
स्वरभंगावर यष्टिमधुचूर्ण तूपसाखरेबरोबर द्यावे. उलटीमध्ये पित्त पडत असल्यास जेष्टमध व रक्तचंदन ही दुधात उगाळून द्यावीत. लघवीला त्रास होत असल्यास जेष्टमधचूर्ण दूधात शिजवून ते पिण्यास द्यावे. खोकला व दम्यामध्ये कफ सुटण्यासाठी यष्टीमधूचा काढा मध व खडी साखर घालून द्यावा. जोडीला मधाचा वापर केल्याने कफ प्रकोप होण्याचा धोका टळतो. विषविकारावर याचा काढा मधाबरोबर द्यावा.

श्वेतेप्रदरात यष्टिमधुचूर्ण तांदूळाच्या ध्रुवणात उगाळून साखरेबरोबर द्यावी. व्रणामध्ये यष्टिमधुचूर्ण तेलात शिजवून ते तेल व्रणरोपणावर वापरावे. रक्तरोगावर श्वेतचंदन व जेष्टमध यांचा काढा करून द्यावा. अतितहान लागत असेल तर जेष्टमधाचा काढा वापरावा.

केशर (Crocuss ativus)

वर्णन

 

१८ ते ३० सेमी. उंचीचे बहुवर्षायू क्षुप. पर्ण मूलीय, रेखाकर, द्विकोष्ठीय पुष्पध्वजाने वेढलेले व मुडपलेल्या कडा असलेले. पुष्प एकाकी २-३ एकत्र मोठे वांगी रंगाचे व सुगंधी. प्रत्येक फुलात तीन तांबूस पिवळे केशर असतात.

नरसाळ्याच्या आकाराच्या परिपुष्पाच्या फांद्या बाहेरील बाजुस पसरलेल्या व नारंगी रंगाच्या टोकाशी अखंड किंवा खंडित असतात. कुक्षी सामान्यत: तीनच्या संख्येत, २.५ सेमी लांब, सुत्राकार व तांबूस रंगाची असते. त्यालाच केशर असे म्हणतात.

अशा प्रकारे एक फुलात तीन केशरतंतू असतात. फळ – आयताकार, गर्भाशय त्रिकोष्ठीय, त्यात गोलाकार बीज. केशराचे कंद लावल्यास १०-१५ वर्षे वनस्पती टिकून राहते. प्रत्येकवर्षी जुन्या कंदाचे जागी एक नवा कंद येतो हा क्रम चालू राहतो. शरद ऋतूत पानांबरोबर फुलेही येतात. मूळ दक्षिण युरोपातून आलेले. स्पेन, फ्रान्स, इटली, ग्रीस, तुर्कस्तान व पर्शिया, भारत व चीनमध्ये लागवड होते. भारतात काश्मीरातील पांपूर भागात व जम्मूमध्ये किश्तवार भागात लागवड करतात.
औषधगुणधर्म
वर्णविकरात लेपासाठी, दृष्टिदौर्बल्यात गुलाबपाण्यात उगाळून डोळयात घालण्यासाठी. मूत्रजनन असल्याने मूत्र त्रास असणाऱ्यास, वाजीकरण आणि गर्भाशयसंकोच असल्याने सकष्टप्रसूतीमध्ये पोटात देण्यासाठी आणि प्रसूतीनंतर गर्भाशयशोधनार्थ. उपयोगात येते. कुक्षीवृन्त, अन्तर्दल, परागकोष करडई इ. पदार्थांची भेसळ केली जाते. वजन वाढविण्यासाठी पाणी, तेल, ग्लिसरिन मिसळतात.

  • शुध्द केशर स्पिरिट किंवा ईथरमध्ये टाकल्यास फारसा रंग येऊ नये.
  • ०.२७५ ग्रॅम क्रोमिक ऍसिड ५० मिली जलात घातल्यास जो रंग येईल तोच रंग ०.१ ग्रॅम केशर तेवढ्या पाण्यात घातल्यास येणे आवश्यक आहे.
  • आर्द्रता ९.१४, जलीय स्त्राव ५०, नेत्रजन २.२२ व भस्म ५.७ टक्‍के असावे.

कोरफड (Liliaceae)
वर्णन
०.३३ ते .६६ मीटर उंचीचे क्षुप. पर्ण ३० ते ४० सेमी. लांब व ७ ते १० सेमी रूंद, टोकाकडे निमुळते, मांसल, कडा काटेरी, पृष्टभागावर पांढरे लांबट ठिपके. एक किंवा दोनच्या जोडीतील मांसल पानांच्या वर्तुळाकार रचनेमुळे क्षुप भरदार दिसते. पानांमध्ये बुळबुळीत व पारदर्शक गर असतो. क्षुप जुने झाल्यावर मध्यभागातून एक दण्ड निघतो. त्याच्या टोकाला तांबूस फूले येतात. थंडीच्या दिवसात फुले व नंतर फळे येतात. पान कापल्यावर त्वचेखाली एक पिवळा कडू रस निघतो. तो वाळल्यावर घट्‍ट होतो त्याला ‘कुमारी सार’ म्हणतात. कोरफडीचा सार औषधी उपयोगी आहे.
औषधगुणधर्म
कफयुक्त खोकला असल्यास कोरफड भाजून अडूळश्याचा रस, मध पिंपळी आणि लवंग चूर्णाबरोबर द्यावी. डोळे आले असल्यास कुमारी स्वरसात शुध्द तुरटी मिसळून मिश्रण गाळून डोळयावर लेप करावा. भाजल्याने झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर लावावा. काविळीवर कोरफडीच्या कांद्याच्या रसात तूप घालून नाकात थेंब सोडावे. नेत्रविकारात कोरफड आणि डाळींबाची पाने एकत्र वाटून त्यांचा लेप करा.

काजू बोंडापासून बनणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांविषयी माहिती द्यावी.

काजू बी आणि काजू बोंडे ही काजू पिकामध्ये दोन महत्त्वाची उत्पादने आहेत आणि काजू बीच्या सहा ते सात पट बोंडांचे उत्पादन मिळते. काजू बोंडाच्या रसामध्ये औषधी गुणधर्म असतात. जसे कातडीचे रोग (स्कर्वी), हगवण, स्त्रियांच्या गर्भाशयाच्या तक्रारी यांवर काजू बोंडाचा रस गुणकारी आहे. कॉलरा रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून तो वापरतात. काजू बोंडांच्या रसाचे नियमित सेवन केल्यास डोळे नेहमी पाणीदार राहतात. बाळंतपणात स्त्रियांनी काजू बोंडांचा रस घेणे फायदेशीर आहे. हे औषधी व पौष्टिक फळ (बोंड) असल्याने त्यावर प्रक्रिया करून, टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.

काजू बोंडांपासून बनविण्यात येणारे टिकाऊ पदार्थ – 1) काजू बोंडांचे ताजे पेय (आरटीएस). 2) काजू बोंडांचे सरबत. 3) काजू बोंडांचा जॅम. 4) काजू बोंडांची कॅण्डी. 5) काजू बोंडांचे लोणचे. 6) काजू बोंडांची पावडर. 7) काजू बोंडांची टॉफी.

Previous Older Entries